How to Download Digital 712 Utara | शेतीचे कर्ज काढणे असो, पीक विमा भरणे असो किंवा जमिनीचा कोणताही व्यवहार असो, शेतकऱ्यांना सर्वात आधी गरज भासते ती म्हणजे ‘सातबारा उताऱ्याची’ (7/12 Utara). पूर्वी अधिकृत आणि कायदेशीर कामासाठी तलाठ्याच्या सहीचा सातबारा आणण्यासाठी महासूल कार्यालयात चकरा माराव्या लागायच्या. परंतु, महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागाने डिजिटल क्रांती करत शेतकऱ्यांचे काम सोपे केले आहे. आता तुम्ही कोणत्याही शासकीय किंवा बँकेच्या कामासाठी वैध असलेला डिजिटल स्वाक्षरीयुक्त (Digitally Signed) ७/१२ आणि ८-अ उतारा अवघ्या ५ मिनिटांत स्वतःच्या मोबाईलवर डाऊनलोड करू शकता. यासाठी कोणत्याही डिजिटल सही किंवा तलाठ्याच्या शिक्क्याची गरज पडत नाही.
डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा कसा डाऊनलोड करायचा? पाहा सविस्तर प्रक्रिया:
स्टेप १: अधिकृत वेबसाईटला भेट द्या
सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमधील गुगलवर जाऊन महसूल विभागाच्या digitalsatbara.mahabhumi.gov.in या अधिकृत सरकारी पोर्टलला भेट द्या.
स्टेप २: लॉगिन करा किंवा नवीन नोंदणी करा
- जर तुम्ही पहिल्यांदाच या वेबसाईटवर आला असाल, तर ‘New User Registration’ वर क्लिक करून आपली माहिती भरा आणि युझर आयडी-पासवर्ड तयार करा.
- तुमच्याकडे आधीच आयडी असल्यास, ‘OTP Based Login’ चा पर्याय निवडून तुमचा मोबाईल नंबर टाकून थेट लॉगिन करू शकता.
स्टेप ३: खात्यात पैसे जमा करा (Recharge Account)
डिजिटल स्वाक्षरी असलेला अधिकृत सातबारा डाऊनलोड करण्यासाठी सरकारकडून प्रति सातबारा १५ रुपये शुल्क आकारले जाते. यासाठी डॅशबोर्डवरील ‘Choose Payment Option’ किंवा ‘Payment’ वर क्लिक करून युपीआय (UPI), गुगल पे, फोन पे किंवा एटीएम कार्डद्वारे तुमच्या डिजिटल वॉलेटमध्ये १५ ते ३० रुपये जमा (Recharge) करून घ्या.
स्टेप ४: जमिनीचा तपशील भरा
लॉगिन केल्यानंतर तुमच्या समोर डिजिटल ७/१२ चा फॉर्म उघडेल. त्यामध्ये खालील माहिती अचूक निवडा:
- तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडा.
- त्यानंतर तुमच्या जमिनीचा गट नंबर (Survey Number/Gat Number) टाका.
- खाली दिलेल्या यादीतून तुमचा योग्य गट नंबर निवडा.
स्टेप ५: सातबारा डाऊनलोड करा
सर्व माहिती भरून झाल्यानंतर खाली दिलेल्या ‘Download’ या बटणावर क्लिक करा. तुमच्या वॉलेटमधून १५ रुपये वजा होतील आणि अधिकृत डिजिटल स्वाक्षरी असलेला ७/१२ उतारा पीडीएफ (PDF) स्वरूपात तुमच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड होईल.
या डिजिटल उताऱ्यावर एक विशिष्ट ‘QR Code’ असतो, ज्यामुळे हा उतारा सर्व प्रकारच्या सरकारी कामांसाठी, न्यायालयासाठी आणि बँक कर्जासाठी १००% वैध मानला जातो.