New LPG Cylinder Rules June | सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचे बजेट थेट गॅस सिलिंडरच्या भावावर अवलंबून असते. १ जून उजाडायला अवघे काही तास उरले असताना, आता सर्वांचे लक्ष तेल विपणन कंपन्यांच्या (OMCs) निर्णयाकडे लागले आहे. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला घरगुती (१४.२ किलो) आणि व्यावसायिक (१९ किलो) गॅस सिलिंडरचे नवीन दर जाहीर केले जातात. सध्या इराण आणि अमेरिका यांच्यातील आंतरराष्ट्रीय तणावामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या आणि इंधनाच्या किमतीत मोठी अस्थिरता पाहायला मिळत आहे, ज्याचा थेट परिणाम भारतामधील गॅसच्या किमतीवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
व्यावसायिक आणि घरगुती सिलिंडरवर काय परिणाम होणार?
मागील काही महिन्यांचा कल पाहिला तर तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या (Commercial LPG) किमतीत सातत्याने कपात केली होती, ज्यामुळे हॉटेल चालक आणि लहान व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला होता. परंतु, घरगुती गॅस सिलिंडरचे दर स्थिर ठेवण्यात आले होते. आता १ जून रोजी होणाऱ्या नवीन घोषणेमध्ये घरगुती गॅस ग्राहकांना दिलासा मिळणार की आंतरराष्ट्रीय संकटामुळे खिसा रिकामा करावा लागणार, याबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.
तुमच्या शहरातील चालू भाव कसे तपासणार?
नवीन दर जाहीर झाल्यानंतर ग्राहक घरबसल्या इंडियन ऑइलच्या अधिकृत वेबसाईटवर (cx.indianoil.in) जाऊन आपल्या शहराचे नाव टाकून लेटेस्ट दर तपासू शकतात. भारतामध्ये दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या चार मुख्य शहरांच्या दरांवरून देशभरातील किमती निश्चित केल्या जातात. राज्यांतर्गत असणारे वाहतूक शुल्क आणि स्थानिक करांमुळे प्रत्येक जिल्ह्यात गॅसचे भाव थोडेफार वेगवेगळे असू शकतात.
१ जूनच्या पहाटे ६ वाजता तेल कंपन्यांकडून अधिकृत दरांची यादी प्रसिद्ध केली जाईल. उन्हाळ्याच्या दिवसांत लग्नसराई आणि इतर कार्यक्रमांमुळे गॅसची मागणी वाढलेली असते, त्यामुळे या द बदलांकडे संपूर्ण बाजारपेठेचे बारीक लक्ष आहे.